Saturday, 29 August 2015

पहिल्या पर्वणीसाठी लाखो भाविक दाखल

नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याला खर्‍या अर्थाने उद्या (दि.२९)च्या पहिल्या पर्वणीने सुरुवात होत असून शाहीस्नानासाठी देशभरातून लाखो भाविक शहरात दाखल होत आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मोठ्या संख्येने होत असलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे रेल्वेस्थानक परिसर फुलून गेला आहे. नाशिक व त्र्यंबकेश्‍वरला आज पहिली पर्वणी होत असून यानिमित्त शाहीस्नानासाठी लाखोच्या संख्येने देशाच्या विविध भागातून असंख्य भाविक नाशिकरोड रेल्वेस्थानकावर दाखल होत आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत रेल्वे पोलिसांच्या अंदाजानुसार सुमारे ६० हजार भाविक शहरात दाखल झाले असले तरीही प्रत्यक्षात ही संख्या लाखोच्या वरती आहे. रेल्वेस्थानकावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रवाशांनी कोणत्या मार्गाने जायचे, कसे जायचे याबाबत पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर प्रवासी बसस्थानकावर येत असून या ठिकाणाहून नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथे जाण्यासाठी बसच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे भाविकांच्या गर्दीमुळे नाशिकरोड रेल्वे व बसस्थानकाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. बसस्थानकाच्या बाहेर काही हातगाडीचालक व रिक्षाचालकांनी ठाण मांडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यानंतर मात्र पोलिसांनी सर्व हातगाडीचालकांना पिटाळल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलीस दक्ष होते. दुपारी २ वाजेनंतर खर्‍या अर्थाने येणार्‍या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. रात्री अनेक रेल्वेगाड्यांनी भाविकांचे जथ्थे शहरात दाखल होत होते. काही भाविक रस्त्याने पायी जात होते तर काही बसेस व रिक्षाने जात होते. मुख्य रस्त्यावर गर्दी; बाजूला सन्नाटा सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीसाठी सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या असून पोलिसांनी अनेक ठिकाणी सायंकाळी ६ वाजेनंतर ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर केल्यामुळे शहराचा मुख्य रस्ता वगळता आजूबाजूच्या रस्त्यावर अघोषित संचारबंदी लागू असल्याचे दिसत होते. तसेच रेल्वेस्थानक, जेलरोड परिसर, बिटको ते द्वारका या रस्त्याने भाविकांची संख्या लक्षणीय होती. त्याचप्रमाणे तीन दिवस व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने अनेक व्यापार्‍यांनी या संधीचा फायदा घेऊन बाहेरगावी जाणे पसंत केले. शाळा, महाविद्यालय, दोन्ही प्रेस तीन दिवस बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. यादरम्यान बाहेरून येणारे भाविक, बसेस व खासगी वाहनांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले.


No comments:

Post a Comment