Saturday, 14 November 2015

स्मार्ट सिटीच्या पहिल्या 20 च्या यादीत पुणे येण्याची शक्यता...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटनच्या दौऱ्यात पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी स्मार्ट सिटीसाठी पुण्याला सहकार्य केले जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने पहिल्या २० शहरांत पुण्याची निवड होणाच्या शक्यतेला बळकटी मिळत आहे. पुण्यासह इंदूर आणि अमरावतीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी साह्य करण्याचे ब्रिटन सरकारने मान्य केल्याने या शहरांनाही प्रथम यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटीसाठी केंद्राची स्पर्धा संपण्यास आणखी महिन्याभराचा कालावधी असतानाच, ही नावे जाहीर करण्यात आल्याने त्याबाबत आक्षेप घेतला जाण्याची चिन्हे आहेत. शहरातील प्रमुख शहरांचा कायापालट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी योजना जाहीर केली.

                पहिल्या टप्प्यात देशभरातून शंभर शहरांची निवड केल्यानंतर आता त्यातील २० सर्वोत्तम शहरांना स्मार्ट सिटी योजनेद्वारे पहिल्या वर्षीचा निधी प्राप्त होणार आहे. त्यासाठी, सल्लागारांच्या माध्यमातून केंद्र सरकारला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. केंद्राने १५ डिसेंबर अशी अंतिम मुदत त्यासाठी दिली आहे. परंतु, तत्पूर्वीच पुणे, अमरावती आणि इंदूर ही शहरे स्मार्ट करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे ब्रिटनतर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, या शहरांना पहिल्या यादीत निश्चित स्थान मिळणार असल्याचे मानले जात आहे. स्मार्ट सिटीची स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना, अशा प्रकारे काही ठराविक शहरांसाठी झुकते माप दिले गेल्यास, त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. मग आटापिटा कशासाठी? गेल्या तीन महिन्यांपासून स्मार्ट सिटी योजनेत पुण्याला स्थान मिळावे, यासाठी महापालिकेतर्फे जोरदार तयारी सुरू आहे. घरोघरी जाऊन नागरिकांकडून त्या संदर्भातील अर्ज भरून घेण्यापासून ते अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध कामांमध्ये गुंतवण्यापर्यंत, पालिकेमध्ये सध्या चर्चा फक्त स्मार्ट सिटीचीच आहे. स्पर्धा संपण्यापूर्वीच पुण्याचे नाव निश्चित असेल, तर मग एवढा आटापिटा कशासाठी केला, अशी विचारणा केली जात आहे. तसेच, हे 'मॅच फिक्सिंग' तर नाही ना, असा सवालही उपस्थित केला जात आहे.               

           'केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या शहरांना स्मार्ट सिटी चे नियोजन, रचना आणि प्रत्यक्ष उभारणी यासाठी ब्रिटिश कंपन्यांचे सहकार्य मिळणार आहे. पुणे शहर देशातील सर्वोत्तम स्मार्ट सिटी बनविण्यासाठीच्या माझ्या प्रयत्नांच्या दृष्टीने ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.' - अनिल शिरोळे, खासदार

No comments:

Post a Comment