Saturday, 14 November 2015

स्मार्ट बनली मुंबईतील सिग्नल यंत्रणा...

          मुंबई - मुंबईला स्मार्ट बनवण्याच्या दृष्टीने पालिकेने ठोस पावले उचलली आहेत. शहर आणि उपनगरातील 590 सिग्नल्सपैकी तब्बल 255 सिग्नल्स स्मार्ट करण्यात आले आहेत. भविष्यात शहरातील सर्वच्या सर्व सिग्नल स्मार्ट म्हणजे स्वयंचलित करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. स्मार्ट वाहतूक सिग्नल्स ही योजना प्रभावीपणे राबवणारी मुंबई पालिका ही देशातील पहिली असेल, असा दावा खुद्द पालिकेनेच केला आहे. 


                 मुंबईकरांची गरज लक्षात घेऊन पालिकेने सिग्नल यंत्रणा स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पालिका क्षेत्रात 255 ठिकाणी अत्याधुनिक व स्वयंचलित प्रकारचे स्मार्ट वाहतूक सिग्नल्स कार्यरत आहेत. उर्वरित 335 ठिकाणी पारंपरिक प्रकारचे वाहतूक सिग्नल्स आहेत. 166 ठिकाणी सतत बंद चालू होणारे फ्लशिंन्ग बीकॉन्स कार्यरत आहेत. त्याप्रमाणे एकूण 756 ठिकाणी वाहतूक सिग्नल्स कार्यरत आहेत.

मुंबई परिसर वाहतूक नियंत्रण प्रकल्प मुंबईत 2008 पासून कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत पहिला स्मार्ट सिग्नल गिरगाव परिसरातील हरकिसनदास रुग्णालयाजवळ त्याच वर्षी बसविण्यात आला. त्याअंतर्गत आतापर्यंत टप्प्याटप्प्याने 255 ठिकाणी स्मार्ट सिग्नल कार्यान्वित केल्याची माहिती पालिका आयुक्तांचे माध्यम सल्लागार राम दुतोंडे यांनी दिली. हे सिग्नल चालवण्यासाठी पोलिसांचे सहकार्य घेतले जाते. मुंबईतील स्मार्ट अत्याधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणा वरळी येथील वाहतूक पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून केले जाते. वाहतूक सिग्नल किंवा वाहनशोधक कॅमेर्‍यांमध्ये बिघाड झाल्यास त्याची माहिती वरळी येथील वाहतूक पोलिस मुख्यालय आणि वरळी येथील अभियांत्रिकी संकुलात संगणकीय प्रणालीद्वारे वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने थेटपणे दुरुस्तीची कार्यवाही तातडीने केली जाते.

कॅमेरे मोजणार वाहने 

स्मार्ट सिग्नल असणार्‍या सर्व 255 ठिकाणी संबंधित सर्व दिशा मार्गावर वाहनशोधक कॅमेरे (व्हेईकल डिटेक्शन कॅमेरे) बसवले आहेत. या कॅमेर्‍यांमुळे रस्त्यांवर धावणार्‍या वाहनांची नोंद करणे शक्य होणार आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने विश्‍लेषण केले जाते. त्यानुसार वाहतूक सिग्नलचा वेळही बदलतो.

एलईडी दिवे वीज वाचविणार 

सिग्नलमध्ये यापूर्वी पारंपरिक पद्धतीचे फिलॅमेंट दिवे होते. त्यात विजेचा जास्त वापर होत होता. विद्युतदाब कमी-जास्त झाल्यास किंवा पावसाचे पाणी दिव्याला लागल्यास दिवे बंद होत असत. आता त्यावर उपायोजना म्हणून एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होऊन बिलाच्या रकमेतही कपात होईल, असा विश्‍वास पालिकेने व्यक्त केला आहे. एलईडी दिव्यांचे आयुर्मान दहा वर्षे असते. 

No comments:

Post a Comment