Tuesday, 24 November 2015

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास शासनाचे प्रयत्न - राज्यमंत्री प्रविण प्रोटे

    सोलापूर दि. 24 :- राज्यात उद्योग, व्यापार वाढला तर रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. उद्योजकांच्या समस्या, अडचणी  सोडविण्यास शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे यांनी दिली.

     सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघ येथे उद्योजकांच्या समस्या जाणून घेताना ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष पेंन्टाप्पा गड्डम, संघाचे राजीव राठी, उद्योग व एमआयडीसीचे अधिकारी यांच्यासह उद्योजक, यंत्रमागधारक उपस्थित होते.

     राज्यमंत्री पोटे म्हणाले, राज्यात उद्योगधंदे वाढावेत यासाठी शासन प्रयत्नशील असून उद्योजकांना प्रोत्साहनही देण्यात येत आहे. उद्योग, व्यापार वाढला तर रोजगार निर्मिती होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.यामुळे उद्योगधंद्याच्या वाढीसाठी   लागणा-या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. तसेच उद्योजकांनी प्रदूषण विरहित उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन श्री. पोटे यांनी केले.

     सोलापूर येथील उद्योजकांनी दिलेल्या निवेदनाचा सकारात्मक विचार केला जाईल असे सांगून राज्यमंत्री पोटे म्हणाले, उद्योजकांना विज बिलात सबसिडी देण्यापेक्षा त्यांना कमी दरात विज उपलब्ध करुन देण्याबाबत शासन विचार करत आहे. कुंभारी येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्याबात आवश्यक माहिती द्यावी. त्यानुसार नवीन एमआयडीसी निर्माण करण्याचा विचार प्राधान्याने केला जाईल.

     प्रारंभी संघाचे संघाचे राजीव राठी यांनी स्वागत केले तर संघाचे अध्यक्ष पेंन्टाप्पा गड्डम यांनी प्रास्ताविकात उद्योजक व यंत्रमागधारकांचा समस्या मांडल्या.

No comments:

Post a Comment